- नितीन कांबळे
कडा : हेड लाईट्स अचानक बंद पडल्याने चालकाचे नियंत्रण सुटून जीप पन्नास फूट खोल विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात दैवबलवत्तर म्हणून गाडीमधील तिन्ही प्रवाशी सुखरूप वाचले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आष्टी तालुक्यातील देविनिमगावजवळ घडली. करण राजू पवार, नितीन अशोक गुंड, बालू शहादेव गुंड ( रा.वाघळूज ता.आष्टी ) अशी जखमींची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील तिघे जण जालना येथे विवाह समारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपून तिघेही जीपमधून परत गावाकडे येत होते. देविनिमगावजवळ येताच चालू जीपची लाईट अचानक बंद झाली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व गाडी रस्त्याच्याकडेला असलेल्या पन्नास फूट खोल विहिरीत कोसळली.
यावेळी विहीर कोरडी असल्याने तिघेही जीपमधून तत्काळ बाहेर पडली. विहिरीमधील पायऱ्याच्या सहाय्याने ते वरती आले. दरम्यान, देवीनिमगाव येथील शिक्षक सचिन मार्कंडे व महाराज फाळके हे दोघे याच मार्गावरून गावाकडे जात होते, त्यांनी हा अपघात पाहिला. दोघांनीही लागलीच जखमींना मदत केली. जखमींवर कडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.