बीड: विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला एसटी बसने समोरासमोर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तीन तरुण ठार झाले. ही घटना २ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता धुळे- सोलापूर महामार्गावरील आहेर वडगाव फाट्याजवळ घडली.
कृष्णा भरत शेळके (२२, रा. दगडी शहाजानपूर, ता. बीड), पारसनाथ मनोहर राेहिटे (२१, रा. आहेरवडगाव, ता. बीड) व अक्षय सुरेश मुळे (२५, रा. घोडका राजुरी, ता. बीड) अशी मयतांची नावे आहेत. ते तिघे आहेरवडगाव फाट्यावरून विरुद्ध दिशेने दुचाकीवरून (एमएच २३ - एल ७२२७) येत होते. यावेळी औरंगाबाद आगाराची औरंगाबाद - लातूर बस ( एमएच १४ - बीटी २४५५) बीडहून लातूरकडे जात होती. अचानक दुचाकी समोर आल्याने चालकाचा ताबा सुटला. यावेळी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. पारसनाथ रोहिटे व कृष्णा शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. अक्षय मुळे याने जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री साडेआठ वाजता प्राण सोडले.
दरम्यान, घटनास्थळी बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी भेट दिली. साबळे व सहकाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघात एवढा भीषण होता, की घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती. हुंदके व अश्रूंमुळे वातावरण सुन्न झाले होते.
डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न, पण...जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. अक्षय मुळे याला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्याचा मृत्यू झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी धाव घेत पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जाधव, डॉ. मनीषा मुंडे, डॉ. अरविंद वाव्हळ, डॉ. शुभम मासाळ यांनी तपासणी व उपचार केले.