अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी रब्बीचे क्षेत्र वाढले असले तरी ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. ज्वारीच्या तुलनेत हरभऱ्याचा पेरा नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे ज्वारीचा पेरा कमी व इतर पिके जास्त अशी स्थिती राहिली. ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अशा शेतकऱ्यांनी आतापासूनच कडबा खरेदीकडे आपली मोहीम वळवली आहे. जे शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात त्या शेतकऱ्यांना कडब्याची नितांत आवश्यकता असते. अशा स्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे बैलबारदाना नाही ते शेतकरी आपला कडबा शंभर पेंढ्या दोन हजारापेक्षाही जास्त भावाने विकू लागले आहेत. पुढील चार महिने हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी मोठा वेळ लागतो. त्यासाठी जनावरांची संपूर्ण मदार ही ज्वारीच्या कडब्यावर असते. पेंढीचे भावही मोठ्या प्रमाणात वाढल्याने कडबा हाच पर्याय राहिला आहे. त्यामुळे ज्वारीच्या कडब्याला मोठा भाव आला आहे.
ज्वारीच्या कडब्याला सोन्याचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:34 AM