- सोमनाथ खताळ
बीड : मुंबईहून आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्या सर्वांवर १० दिवस उपचार करण्यात आले. आता १० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतत आहेत. यात पाटोदा तालुक्यातील मायलेकीसह केजचे, बीडचे ५ आणि इटकूर येथील एका महिलेचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १५ झाली आहे.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत ६२ जणांची कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. यात एकाचा मृत्यू झाला होता तर आतापर्यंत पाच जण कोरोनामुक्त झाले होते. सहा रुग्णांना पुण्याला पाठविले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ५० रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील पाटोदा तालुक्यातील वाहली येथील मायलेकी, बीड शहरातील पाच, इटकूर येथील महिला व केज तालुक्यातील चंदणसावरगाव व केळगाव येथील रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना शनिवारी सायंकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे. त्यामुळे आता केवळ ४० रुग्ण उपचारासाठी राहणार आहेत. धारूर आणि पिंपळा येथील रुग्ण वगळता सर्व कोरोनाबाधित हे मुंबईहून आलेले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार व त्यांच्या टिमने या सर्व रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले आहे. बीड जिल्ह्यासाठी ही सुखद वार्ता आहे.
आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले रुग्णगेवराई तालुक्यातील इटकूर येथील मायलेकी अशा दोघी, माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील १, कवडगाव थडी येथील २, बीड शहरातील ५, पाटोदा तालुक्यातील वाहली येथील मायलेकी अशा दोघी, आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील १, केज तालुक्यातील केज व चंरणसावरगाव येथील दोघे, असे १५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
पाटोद्याच्या वृद्धालाही उद्या सुटीपाटोदा शहरातील ७३ वर्षीय वृद्धालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मागील १० दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्यांचीही प्रकृती ठणठणीत झाली आहे. त्यामुळे त्यांनाही रविवारी सुटी दिली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. या आजोबाची प्रकृती सुरूवातीला खुपच चिंताजनक होती. परंतु डॉक्टरांनी योग्य उपचार करून त्यांना ठणठणीत केले आहे.
गोंधळू नका, नियम वाचापूर्वी एखादी व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आढळली की तिच्यावर १४ दिवस उपचार केले जात होते. त्यानंतर स्वॅब घेतला जाईल. पहिला स्वॅब निगेटिव्ह आल्यावर पुन्हा २४ तासांनी दुसरा स्वॅब घेतला जायचा. हे दोन्ही निगेटिव्ह आले तरच तो कोरोनामुक्त घोषित केला जात असे. परंतू आता इंडियन कॉन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च नियमात बदल केला आहे. १० दिवस उपचार केल्यावर संबंधिताला कसलेही लक्षणे न आढळल्यास तो कोरोनामुक्त झाला असे घोषित करण्यास सांगितले. एखाद्याची प्रकृृती खुपच चिंताजनक असेल तर १४ व्या दिवशी दोन वेळा स्वॅब घेऊन ते निगेटिव्ह आले तरच तो कोरोनामुक्त झाला, असे घोषित करण्यात येणार आहे. नियमातील या बदलाची माहिती नसल्याने अनेकजण गोंधळून गेले होते.