परळी (बीड ) : मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या शब्दाला सरकार जागले नाही म्हणुनच समाजावर ठोक मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. या समाजाच्या आरक्षणाबाबत समाज भावना न समजणारे सरकार बालीश बुध्दीचे असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. आरक्षणासाठी ठोक मार्चाचा हा निर्णायक लढा आहे मात्र तो आपण शांततेच्या मार्गाने लढावा असे आवाहनही त्यांनी केले.
मराठा आरक्षणासाठी मागील आठ दिवसापासुन परळी शहरात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला आज मुंडे यांनी भेट दिली. आंदोलकांशी चर्चा करतांना त्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला व काही काळ या आंदोलनात सहभाग घेतला. मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा देवुन लढत आहे. प्रत्येक व्यासपिठावर त्यासाठी भांडत आहे आज या ठिकाणी भाषण नको अशी भुमिका त्यांनी घेतली होती मात्र, कार्यकर्त्यांनी भाषण करा असा आग्रह धरल्याने त्यांनी छोटेखानी मनोगत व्यक्त केले.
आरक्षण पोटाची लढाई
राज्यात ५८ मोर्चे शांततेत करणार्या समाजाला सरकार साप सोडतो, पेड कार्यकर्ते आहेत असे म्हणुन खिजवत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. आरक्षणाच्या या लढाईचा निर्णायक लढा परळीतुन उभा राहत असल्याने परळीची इतिहासात नोंद होईल असे सांगताना मराठा समाजाने समाजातील सर्व वंचित घटकांना आरक्षण देताना पाठिंबा देण्याची भुमिका घेतली होती. आज हा समाज एकरा वरून गुंठ्यावर असलेला असल्याने त्यांना आरक्षण हवे आहे हे आरक्षण म्हणुन प्रतिष्ठेची नव्हे तर पोटाची लढाई असल्याचे ते म्हणाले. काकासाहेब शिंदे सारखे युवक आरक्षणासाठी जिव देत असतांनाही सरकार जागे होत नाही. उद्या हि परिस्थिती अधिक बिकटली तर त्यास सरकार जबाबदार राहिल असा इशारा देतानाच शांततेच्या मार्गाने हा लढा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.