बीड : सध्या कोरोना संशयित व बाधित रुग्णांची एचआरसीटी तपासणी केली जाते. त्यात येणाऱ्या स्कोअरवरून उपचाराची दिशा ठरविली जात आहे. परंतु एका २७ वर्षीय महिलेचे एचआरसीटी केले असता जिल्हा रुग्णालयात ३ स्कोअर आला. तर खासगीत १० आला. एकाच दिवसात एवढा स्कोअर वाढू शकत नाही. त्यामुळे यात खरे कोण आणि खोटे कोण, असा प्रश्न आहे. स्कोअरमधील तफावतीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण झाला आहे.
एका महिलेला त्रास होत असल्याने २९ एप्रिलला जिल्हा रुग्णालयात तपासणी केली. त्यांची एचआरसीटी तपासणी केली. यात त्यांना ३ स्कोअर असल्याचा अहवाल देण्यात आला. याच महिलेने लगेच खासगी सिटी स्कॅन सेंटरवर जाऊन तपासणी केली. यात त्यांचा स्कोअर १० दाखविण्यात आला. विशेष म्हणजे या तपासणी अवघ्या काही तासांच्या अंतराने केल्या होत्या. एवढ्या वेळात इतका स्कोअर वाढू शकत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. हाच धागा पकडून वंचित बहुजन आघाडीने पुराव्यानिशी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.