बीड : एका प्राण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतात. मात्र शेतकऱ्यांप्रती कोणीच पुढे येत नाही. प्राण्यांप्रमाणेच शेतकऱ्यांप्रती कोणीच संवेदनशिलता दाखवित नाहीत. केवळ राजकारण केले जाते, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे महासचीव सौरभ खेडेकर यांनी केला.
संभाजी ब्रिगेडच्यावतीने संघटन वाढीसाठी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर दौरा केला जात आहे. मंगळवारी ते बीडमध्ये मेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर कडाडून टिका केली. मराठवाड्यात दौरा करीत असताना परिस्थिती अत्यंत विदारक दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थिती असताना सरकारकडून दुष्काळसदृष्य असा शब्दप्रयोग केला जात आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना सरकार यावर काहीच उपाययोजना करीत नाही. प्राण्याच्या बाबतीत मात्र सर्वत्र आवाज उठविला जातो. विरोधकही यामध्ये मागे नाही. याच प्राण्याप्रमाणे शेतकऱ्यांप्रती सर्वांनी संवेदनशिलता दाखविली तर नक्कीच आधार मिळेल, असेही खेडेकर यांनी सांगितले. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष राहूल वाईकर, सुधीर देशमुख, बालाजी जाधव, कपील डोके, सुदर्शन तरब, अशोक ठाकरे आदींची उपस्थिती होती.
... तर जल्लोष करू देणार नाहीमराठा समाजाला ओबीसीचा दर्जा द्यावा. हे सरकार खोटी माहिती देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे. हे सरकार मराठ्यांना आरक्षण देऊच शकत नाही. आरक्षणाचा मुद्दा दुर्लक्षित करण्यासाठी शहरांचे नामांतरण करण्याचे नवीन राजकारण सरकारकडून केले जात आहे. मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही तर २०१९ साली कोणालाच जल्लोष करू देणार नाही, असा इशाराही सौरभ खेडेकर यांनी दिला.
युतीसाठी आॅफर आल्यामागील दोन वर्षांपासून संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरले आहे. येणाऱ्या निवडणूका लढविण्यासाठी आम्हाला अनेक आॅफर आल्या. मात्र आताच त्यावर निर्णय घेणार नाहीत. ३० लोकसभा व १०० ठिकाणी विधानसभा निवडणूक लढविण्याचा आमचा संकल्प असल्याचे खेडेकर म्हणाले, तर बीडमध्येही लोकसभा व १ जागेवर विधानसभा लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राहूल वाईकर यांनी सांगितले.