शिक्षक मैत्री प्रतिष्ठान ची मागणी
शासनाने जुनी पेन्शन योजना जाहीर करावी
शिक्षक मैत्री प्रतिष्ठान ची मागणी
अंबाजोगाई : राज्यात १ नोव्हेंबर २००५पूर्वीच्या विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदांवर व तुकड्यांवर नियुक्त तसेच २००५नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाने १९८२ची जुनी पेन्शन योजना तातडीने जाहीर करावी, अशी मागणी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविले आहे.
राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदांवर व तुकड्यांवर नियुक्त सुमारे २५ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन लागू करावी. या मागणीसाठी राज्यभरात शिक्षक भारती संघटनेकडून अनेक आंदोलने करण्यात आली. महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय सभापतींनी दिलेल्या निर्देशानुसार उपरोक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी २४ जुलै २०१९ला एक संयुक्त समिती गठीत करण्यात आली होती. परंतु दोन वर्षे उलटली तरी समितीचा अभ्यास अद्याप पूर्ण झालेला नाही. समितीने आपला निर्णय तत्काळ देऊन शिक्षक व इतर कर्मचारी यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विजय रापतवार यांनी केली आहे.