अंबाजोगाई- अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. या नुकसानीतून शेतकर्यांना बाहेर काढण्यासाठी शासकीय मदतच आधार ठरेल. राज्य सरकारचा मदतीचा हात प्रथम पुढे आला पाहिजे. केंद्र सरकार तर मदत देणारच आहे. केंद्राच्या मदतीची वाट पाहत शेतकर्यांना वार्यावर न सोडता तात्काळ मदत करावी. अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अंबाजोगाई तालुक्यात अपत्तीग्रस्त शेतकर्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
अंबाजोगाई तालुक्यातील चतुरवाडी येथे मंगळवार दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी आपत्तीग्रस्त शेतकर्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ.नमिता मुंदडा, आ.सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार, आ.रमेश कराड,आ.अभिमन्यु पवार, रमेशराव आडसकर, भिमराव धोंडे, अक्षय मुंदडा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, भगवान केदार, प्रवक्ते राम कुलकर्णी, सांरंग पुजारी, अॅड.संतोष लोमटे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित शेतकर्यांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, वर्षभरापासुन सातत्याने शेतकर्यांवर संकटाचा मारा सुरूच आहे. अतिवृष्टी, वादळी, पाऊस, गारपीट यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्यांनी पिकविमा भरूनही विमा कंपन्या शेतकर्यांना मुर्ख बनवत आहेत. अशा स्थितीत शेतकर्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली पाहिजे. मात्र राज्य शासन शेतकर्यांच्या बाबतीत वेळ काढूपणा करत आहे. त्यांना वार्यावर सोडण्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली.
...तर नियम बदलाअतिवृष्टी व वादळी पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात इतर पिकांसोबत ऊस मोठ्या प्रमाणात आडवा पडला आहे. या संदर्भात नुकसानीची मागणी शेतकर्यांनी शासनाकडे केली आहे. मात्र शासन हे नुकसान निकषात बसत नाही असे कारण पुढे करून शेतकर्यांना टाळत आहे. असे निकष आडसर ठरत असतील ते बदलून शेतकर्यांना मदत केली पाहिजे अशी मागणीही फडणवीस यांनी केली.