- संजय खाकरे परळी (बीड): देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दुपारी साडेतीनच्या सुमारास भेट दिली. यावेळी राज्यपालांनी प्रभू वैद्यनाथाचे अभिषेक करून मनोभावे दर्शन घेतले.
अंबाजोगाई येथून योगेश्वरी देवी मंदिराचे दर्शन घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परळी येथील वैद्यनाथ मंदिरात आले. यावेळी बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, परळीच्या उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजूळ उपस्थित होते. देवस्थान ट्रस्टच्यावतीने राज्यपालांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी विश्वस्तांची चर्चा करून माहिती घेतली. सचिव राजेश देशमुख, विश्वस्त प्रा. प्रदीप देशमुख, प्रा. बाबासाहेब देशमुख , विजयकुमार मेनकुदळे, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, रघुवीर देशमुख, नागनाथराव देशमुख, नंदकिशोर जाजू, राजाभाऊ पुजारी आदी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्यपालांचा आज येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या विश्रामगृहावर मुक्काम आहे.