दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:08 AM2018-11-02T00:08:21+5:302018-11-02T00:09:28+5:30
शासनाने काल काढलेला दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक आहे. दुष्काळच्या बाबतीत कसलीही आर्थिक तरतूद न करता केवळ घोषणा करून जनतेची घोर फसवणूक करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. फडवणीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन्हा रद्द करतात, असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : शासनाने काल काढलेला दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक आहे. दुष्काळच्या बाबतीत कसलीही आर्थिक तरतूद न करता केवळ घोषणा करून जनतेची घोर फसवणूक करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. फडवणीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन्हा रद्द करतात, असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.
अंबाजोगाईत काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून अशोक चव्हाण बोलत होते.
ते म्हणाले, राज्यावर दुष्काळाची छाया पसरलेली असतांना शासन केवळ घोषणाबाजी करत आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत गंभीर, मध्यम, अशी दुष्काळाची वर्गवारी कधीच अस्तित्वात नव्हती. ज्याला कामच करायचे नाही ते वर्गवारी करीत जनतेची दिशाभूल करू लागले आहेत. महाराष्ट्राचे मंत्री रात्री जाऊन मोबाईलच्या प्रकाशात दुष्काळाची पाहणी करून जनतेची टिंगल करू लागले आहेत. कर्जमाफीतही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला हलविण्याचे काम जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुरू असल्याचे चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी माजी खा. रजनी पाटील, माजी मंत्री सुरेश नवले, प्रा. टी. पी. मुंडे, डॉ. अंजली घाडगे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक राजकिशोर मोदी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्संग मुंडे यांनी केले. अॅड. विष्णूपंत सोळंकी यांनी आभार मानले. या जनसंघर्ष यात्रेस महिला व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मेडीकल कॉलेजपासून निघालेली जनसंघर्ष यात्रा व मोटारसायकल रॅली शहरातून निघाली होती. या यात्रेचा समारोप वंजारी वसतिगृहाच्या मैदानावर भव्य सभेने झाला.
भाजपा म्हणजे केवळ घोषणांचा कारखाना
चव्हाण म्हणाले, अच्छे दिन कभी नहीं आते हे खुद्द गडकरी यांनीच मान्य केले आहे. सरकारमधील आमदार, मंत्रीही जनतेशी नीट वागत नाहीत. ‘बेटी बचाव’ चा नारा देणाºया या सामाजिक विषमता निर्माण करू व्होट बँक ताब्यात घेण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. आता राम मंदिराचा प्रश्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आला आहे. तर धर्माच्या नावावर अत्याचार करणारे सनातन,भिडे, एकबोटे यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण या संदर्भात कसलाही ठोस निर्णय झाला नाही. पाण्यावरून आज जिल्ह्याजिल्ह्यात वाद निर्माण होत आहेत. शासनाने जीआरप्रमाणे पाणीवाटप करावे, पाणी पेटविण्याचे काम सरकारने करू नये, असे ते म्हणाले.
पालकमंत्री अदृश्य, बॅटरीच्या उजेडात दुष्काळ पाहणी
अशोक चव्हाण म्हणाले, राज्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असतांना राज्याच्या ग्रामविकास व जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या अमेरिकेत अदृश्य झाल्या आहेत. तर निलंगेकर दुष्काळाची पाहणी मोबाईल बॅटरीच्या उजेडात करू लागले आहेत. अशी जनतेची टिंगलटवाळी बंद करा.
बीड लोकसभेसह विधानसभेच्या दोन जागा द्या- राजकिशोर मोदी
काँग्रेस व राकाँची आघाडी झाली तर बीड जिल्ह्यात लोकसभेची जागा व विधानसभेच्या दोन जागा काँग्रेस पक्षाला द्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आपल्या प्रास्ताविकात केली. या मागणीला अशोक चव्हाणांनी दोनच नाही तर आणखी एक विधानसभेची जागा बीड जिल्ह्याला वाटाघाटीत मागण्यात येईल, असे जाहीर उत्तर दिले.
वातावरण काँग्रेसमय होऊ लागले आहे - हर्षवर्धन पाटील
येत्या काळामध्ये राज्यात परिवर्तन निश्चित असून वातावरण काँग्रेसमय होऊ लागले आहे. भाजप सरकारला शेतकºयांबद्दल कसलीही चिंता नसून, गेल्या साडेचार वर्षात शेतकरी संकटात लोटला गेला आहे. आगामी काळात बीड जिल्ह्यापासून बदलासाठी सुरुवात करा, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सभेसाठी उपस्थित समुदायाला केले.
मोदी - शहा म्हणजे रंगा - बिल्लाची जोडी !
आपल्या भाषणात बोलताना माजी खा. रजनी पाटील म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा ही रंगा-बिल्लाची जोडी आहे. लोकसभागृहातही ते जोडीनेच बसतात. त्यांच्या खासदारातही या दोघांची दहशत असल्याने त्यांचे खासदारही जनतेच्या प्रश्नावर तोंड उघडायला तयार नाहीत.