लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्ह्यात १२९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. यापैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या होत्या. मतदानात २४२१ मतदारांनी नोटाचा वापर केला. सर्वाधिक नोटांचा वापर माजलगावमध्ये झाला.
आंबलवाडीत शिवकांता संदिपान गर्जे व जनाबाई महादेव गर्जे या दोन उमेदवारांना प्रत्येकी २७९ मते मिळाली होती. मतमोजणी झाल्यानंतर सोडत काढण्यात आली. दोन्ही उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठया बंद बरणीमधून सुमित अंकुश हेडे या बारा वर्षांच्या मुलाने चिठ्ठी काढली त्यात शिवकांता गर्जे या विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. बीड तालुक्यात पिंपळगाव मंजरा ग्रामपंचायतीमध्येही एका प्रभागात समान मते पडल्यामुळे चिठ्ठी काढून उमेदवार घोषित करावा लागला.
माजलगाव तालुक्यात नोटाला सर्वाधिक मते
माजलगाव तालुक्यात नोटाला सर्वाधिक म्हणजे ५७१ मते मिळाली. विशेष म्हणजे इतर तालुक्यांच्या तुलनेत इथे निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीची संख्याही कमी होती. बीड तालुक्यात ४३७, केज तालुक्यात ४९४ मते नोटाला मिळाली. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपैकी कुणीही मला योग्य वाटत नाही, असे ज्या मतदाराला वाटते, तेव्हा तो नोटाचे बटन दाबून आपले नकारार्थी मतांची नोंद करीत असतो.
पाच ठिकाणी समान मते मिळाल्याने चिठ्ठीने निकाल
गेवराई तालुक्यातील खेर्डा बु. ग्रामपंचायतीमधील वार्ड क्रमांक २ मधील शरद कादे यांना ६४, तर नवनाथ चव्हाण यांना ६४ मते पडल्यामुळे तहसीलदार सचिन खाडे याच्या उपस्थितीत लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढून नवनाथ चव्हाण विजयी घोषित करण्यात आले. याच ग्रामपंचायतीमधील वार्ड क्रमांक ३ मध्ये गयाबाई कांदे आणि ज्योती रडे यांना समान मते पडल्याने चिठ्ठी काढून ज्योती साईनाथ रडे विजयी घोषित करण्यात आल्या.
केज तालुक्यात पैठण ग्रामपंचायतीमध्ये महिला राखीवसाठी असलेल्या वार्ड क्र. ३ मधील दोन महिला उमेदवारांना समसमान मते पडल्याने चिट्ठी काढून नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांनी त्या महिलेस विजयी घोषित केले.