बीड: आपण सरपंच पदी निवडून आला आहात, आचार संहिता भंग होणार नाही, डिजे लाऊन जल्लोष न करता साध्या पद्धतीने विजय साजरा करावा या आशायाच्या नोटीसा पोलिसांनी उमेदवारांना मतमोजणीच्या ठिकाणी दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदी आदेशाचे पालन करीत कलम १४९ सीआरपीसी अंतर्गत या नोटीसा देण्यात आल्या.बीड तालुक्यातील १२० ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल बीड शहरातील आयटीआय येथे मंगळवारी जाहीर झाले. तत्पुर्वी पोलिसांनी कलम १४९ सीआरपीसी अंतर्गत नोटीसा तयार करुन ठेवल्या होत्या. निकाल जाहीर होताच एक पोलिस कर्मचारी विजय सरपंच यांचे नाव, पद व पक्ष विचारुन त्यांना नोटीसा देत होता. प्रत्येक विजय उमेदवारास नोटीस देण्यात आली आहे. नियमांचे उल्लघंन केल्यास त्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
नोटीशीत काय म्हटले आहे?
ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे. आपण सरपंच पदी निवडणून आला आहात. सध्या आचार संहिता सुरु असल्याने आपण आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. नियम व अटींचे तंतोतंत पालन करावे. विजय साध्या पद्धतीने जल्लोष साजरा करावा. गावात कोणत्या ही प्रकारे वाद्य, फटाके वाजवून, डी.जे. लाऊन मिरवणूक काढू नका. आपल्याकडून किंवा आपल्या ग्रामपंचायत सदस्यांकडून आदर्श आचार संहितेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करु नये. व्हॉट्सॲप व फेसबुकवर कोणत्याही पोस्ट करु नयेत. तसेच जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशान्वये सध्या जमाव बंदी आदेश लागू आहे. त्यामुळे या सर्व बाबींचे उल्लंघन केल्यास आपणास जबाबदार धरुन आपणा विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल असे १४९ सीआरपीसी नोटीसीमध्ये नमुद आहे.