- नितीन कांबळेकडा (बीड) : ग्रामपंचायत निवडणुकीत पडल्याचा राग मनातधरून अहमदनगर पोस्टातून एका कुटुंबाला आलेल्या धमकी पत्राने खळबळ उडाली आहे. पत्रात संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा उल्लेख असल्याने उसतोड कामगार भयभीत झाले आहेत. निवडणूक झाली पण प्रचारातील कटुता, निकालातील पराभव अनेकांच्या जिव्हारी लागल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तात्रय गहिनीनाथ औटे हे आष्टी तालुक्यातील नांदा येथील रहिवासी असून उसतोड मुकादमकी करतात. त्यांना ३० डिसेंबर रोजी अहमदनगर पोस्टातून एक निनावी बंद पाकीट आले. ते उघडून बघितल्यावर त्यात मला व माझे आई, वडील यांना जिवे मारण्याची धमकी असलेले पत्र आढळून आले. कुटुंब संपविण्यासाठी पाच लाख रूपयांची सुपारी दिल्याचे नमूद आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत तुमच्यामुळे माझा मुलगा सरपंच झाला नाही, असा उल्लेख केलेला आहे.
या निनावी पत्राने औटे कुटुंब भयभीत झाले आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात दत्तात्रय गहिनीनाथ औटे यांच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.