बीड : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना हादरा बसला असून, नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. सुरेश धस, माजी आ. अमरसिंह पंडित, आ. नमिता मुंदडा समर्थकांनी आपापल्या मतदारसंघात चांगले यश मिळवले.
माजलगाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके यांंच्या गटाला हाबाडा बसला. गंगामसला, दिंद्रुडमध्ये भाजप, नित्रूडमध्ये कम्युनिस्ट, तर मोगरा येथे संमिश्र पॅनेल आल्याचा दावा करण्यात येत आहे.
गेवराई तालुक्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेत राष्ट्रवादीने वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. २२ पैकी ९ ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीने बाजी मारली. भाजपकडे ५, शिवसेनेकडे ४ ग्रामपंचायती आल्या.
धारूर तालुक्यातील चारपैकी दोन ग्रामपंचायती भाजपच्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात एक ग्रामपंचायत आली. वडवणी तालुक्यात देवळा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का बसला. सोन्ना खोटा, देवळा ग्रामपंचायत आ. प्रकाश सोळंके यांच्या गटाच्या ताब्यात आल्या.
अंबाजोगाई तालुक्यातील सातपैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तीनपैकी दोन राष्ट्रवादीच्या, तर एक भाजपच्या ताब्यात आली. परळी विधानसभा मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई तालुक्यातील एकूण बारापैकी १० ग्रामपंचायती आपल्या पॅनेलकडे आल्या असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला आहे. मतदारांनी धनंजय मुंडेंवर विश्वास टाकत १२ पैकी दहामध्ये विजय मिळवून दिला.
आष्टी, पाटोदा तालुक्यांतही आ. सुरेश धस समर्थकांचे वर्चस्व दिसून आले. बीड तालुक्यातील २९ पैकी २१ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्याचा दावा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केला आहे. केज तालुक्यात २३ पैकी १२ जागा जिंकल्याचा दावा भाजपने, तर १४ जागांवर राष्ट्रवादीने दावा केला.