बीड: ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारत दुरुस्ती कामाचे ३० हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी व जीएसटीचा धनादेश ग्रामपंचायतच्या खात्यात जमा करण्याऐवजी थेट देण्यासाठी कंत्रादाराला ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला जेरबंद करण्यात आले. लाचुलचपत प्रतिबंधक विभागाने ७ जानेवारी रोजी पहाटे आष्टी तालुक्यात ही कारवाई केली.
सय्यद शकील सय्यद जमादार (वर्ग४६) वर्ग ३ असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे. तो आष्टी तालुक्यातील गहूखेल /बेलतुरी ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहे. तक्रारदार कंत्राटदाराने ग्रामपंचायत इमारत दुरुस्तीचे काम केले होते. केलेल्या कामाचा धनादेश तसेच जीएसटीचा ४२ हजार ७४२ रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतच्या खात्यात जमा करण्याऐवजी थेट कंत्रादाराला देण्यासाठी ५० टक्के रक्कम लाच स्वरुपात देण्याची मागणी ग्रामसेवक सय्यद शकीलने केली होती. २३ डिसेंबर २०२१ रोजी याबाबत कंत्राटदाराने बीड एसीबीकडे तक्रार केली होती. त्याच दिवशी पडताळणी केली तेव्हा लाच मागणी केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, त्यानंतर संशय आल्याने सय्यद शकीलने लाच स्वीकारली नाही. मागणी केल्याने त्याच्याविरुध्द ३० हजार रुपये लाच मागणी केल्याप्रकरणी आष्टी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
पहाटे घेतले ताब्यातएसीबीचे उपअधीक्षक भारत राऊत यांनी ७ जानेवारी रोजी पहाटे सय्यद शकील यास धामणगाव (ता.आष्टी) येथे राहत्या घरातून ताब्यात घेतले. पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, हनुमान गाेरे, श्रीराम गिराम, चालक गणेश म्हेत्रे यांनी ही कारवाई केली.