बीड : घराच्या विद्युत मीटरसाठी पीटीआर देण्यासाठी तीन हजार रूपयांची लाच घेताना बीड तालुक्यातील कुटेवाडी येथील ग्रामसेवक जगन्नाथ एकनाथ टूले यास मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड पंचायत समिती परिसरात झाली.
कुटेवाडी येथील एका इसमाचे इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुलाचे बांधकाम झाले आहे. या घरासाठी विद्युत मीटर घ्यावयाचे असल्याने त्यांनी कुटेवाडीचा अतिरिक्त पदभार सांभाळणाºया ग्रामसेवक जगन्नाथ एकनाथ टूले याच्याकडे पीटीआर देण्याबाबत विनंती केली. यावेळी टूले याने सदरील इसमास १०० रुपयांच्या बाँंडवर शपथपत्र देऊन त्यासोबत ५ हजार रूपयांची मागणी केली. ही रक्कम कशासाठी असे विचारले असता पाच हजार दिले तरच तुज्या घराची नोंद होईल, नाहीतर होणार नाही असे बजावले. तडजोडीअंती तीन हजारात नोंद करून देण्यास ग्रामसेवक टूले तयार झाला.
सदरील इसमाने याची तक्रार लाचलुचपत विभागाच्या बीड शाखेकडे केली. बीड एसीबीने मंगळवारी सापळा लावून दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास बीड पंचायत समिती परिसरात टूले यास रंगेहाथ पकडले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.