माजलगाव : तालुक्यातील देवखेडा येथे धरणाच्या पायथ्याला असलेल्या शेतातील आखाड्यात आजोबा व नातू अडकून पडले असून झाडावर चढून त्यांनी आपला बचाव केला. चार तासानंतरही विविध प्रयत्न करून त्यांना काढता आले नाही.
धरणाचे पाणी वाढल्यानंतर आजोबा नातवाला घेऊन झाडावर चढल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. मंगळवारी चार वाजता धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानंतर धरणाच्या पायथ्याशीच असलेल्या आखाड्यात रामप्रसाद गोविंद कदम व त्यांचा सात वर्षांचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हे आपल्या गोठ्यात बसले होते. अचानक पाण्यात वाढ झाल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. या दोघांनी बाजूला असलेल्या झाडावर चढून आपले प्राण वाचवले. त्यांनी झाडावर चढल्यानंतर आरडाओरड व फोन केल्यानंतर ही बाब लक्षात आली.
घटनास्थळी तहसीलदार पाटील व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फराटे तळ ठोकून होते. पाण्यात भोयांनी जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही जास्त पाण्यामुळे जात आले नाही. दरम्यान, परळी येथून बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केल्याची माहिती तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली.