अंबाजोगाई : शहराजवळील चनई शिवारातील एका शेतात वृद्धेचा मृतदेह आढळल्याने १९ रोजी एकच खळबळ उडाली हाेती. या वृध्देचा खून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा २४ तासांच्या आत उलगडा करण्यात अंबाजोगाई शहर पोलिसांना यश आले. शेळी विकल्याच्या क्षुल्लक वादातून बेदम मारहाण करून आजीचा खून केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी नातवाला अटक केली आहे.
सरूबाई हरिभाऊ वारकड (वय ६५, रा. चनई, ता. अंबाजोगाई) असे त्या मृत वृध्देचे नाव आहे. सरूबाई यांचा मुलगा राजेभाऊ (ह.मु. वाशी, जि. उस्मानाबाद) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची चनई शिवारात जमीन आहे. आई सरूबाई यांच्याकडे तीन शेळ्या असून, त्यांना चारण्यासाठी त्या दररोज शेतात जात. १६ रोजी शेतात गेलेल्या सरूबाई घरी परतल्या नव्हत्या. याबाबत चुलत भावजय संगीता अनंत वारकड यांनी १८ रोजी राजेभाऊ यास कळवले. त्यामुळे आईचा शोध घेण्यासाठी पत्नी छायासह राजेभाऊ त्याचदिवशी चनईला आले. दरम्यान, सरूबाई यांचा मृतदेह अमर अनंत वारकड यांच्या पडीक शेतात असल्याची माहिती राजेभाऊ यांना मिळाली. त्यांनी पोलिसांसह या ठिकाणी तपासले असता, सरूबाई यांचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वाराती रुग्णालयात पाठविला. चौकशीदरम्यान पोलिसांना सरूबाई आणि त्यांचा नातू राहुल बालासाहेब वारकड (२०) यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयावरून राहुलला ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी सरूबाई यांचे शवविच्छेदन झाले असता, त्यांचा मृत्यू छातीवर मुकामार लागल्याने डाव्या बाजूचे फासळीचे हाड मोडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दुपारी सरूबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजेभाऊच्या फिर्यादीवरून राहुल वारकड याच्यावर कलम ३०२ अन्वये शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी करत आहेत.
शेळी विक्रीचा जाब विचारल्याने घेतला जीवसरूबाई यांच्याकडील तीन शेळ्यांपैकी एक शेळी राहुलने अंबाजोगाईच्या आठवडी बाजारात नेऊन संजय रामकिसन काळे यास विकली होती. याबाबत माहिती झाल्यानंतर सरूबाई आणि राहुलमध्ये वाद झाला. याच वादातून राहुलने सरूबाई यांना छातीवर बेदम मारहाण केली. यातच त्यांचा मृत्यू झाला.