लसीकरणचा वेग वाढविण्यासाठी जागृतीची गरज
वडवणी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला ग्रामीण भागात व शहरातील नागरिकांची गती मिळत नसल्याची स्थिती आहे. लस उपलब्ध असतानाही ऑनलाईनच्या गोंधळामुळे नागरिक लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनाने जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
प्लास्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर
माजलगाव : महाराष्ट्र राज्यात प्लास्टिकच्या वापरास बंदी असताना शहरात मात्र प्लास्टिकच्या कॅरिबॅग सर्रास वापरल्या जात आहेत. स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. किरकोळ तसेच ठोक विक्रेत्यांकडून प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर सुरू करण्यात येत आहे.
बाजारात गर्दी; सोशल डिस्टन्स दिसेना
पाटोदा : तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. खरिपाच्या पेरणी उरकल्या आहेत. या पावसामुळे पीक वाढ चांगली होणार आहे. अनेक ठिकाणी शेतकरी वाफसा होण्याची वाट पाहात आहेत, तर काहीजण खत, औषधांसाठी बाजारात गर्दी करीत आहेत.
वृक्षतोड थांबविणे गरजेचे
वडवणी : तालुक्यातील मामला, साळिंबा, कान्हापूर, लक्ष्मीपूर, पिंपरखेड, कवडगाव, चिंचोटी, काडीवडगाव, देवडी, चिंचाळा, तिगाव, पुसरा, खडकी देवळा, चिंचवण, कोठरबणसह ग्रामीण भागातील वृक्षावर दिवसाढवळ्या कुऱ्हाड चालविली जात आहे. ना धाक ना कंट्रोल अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.
शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान वाटप करा
वडवणी : कर्ज माफीची घोषणा होऊन दोन वर्षे होत आहेत.
शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु दोन वर्षे उलटूनही अद्यापपर्यंत महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही. शेतकऱ्यांनी या अनुदान वाटपाची मागणी केली आहे.
वेगवान वाहनांमुळे अपघातात वाढ
अंबाजोगाई : शहर व तालुक्यात सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भरगर्दीच्या रस्त्यातही काही टवाळखोर युवक सुसाट वेगाने दुचाकी चालवीत असल्याने इतर वाहन चालक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. सुसाट वेगाने वाहन चालविल्यामुळे अपघातही वाढले आहेत. त्यामुळे अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची गरज आहे.
पावसाळ्यापूर्वी फवारणी करावी
अंबाजोगाई : कोरोनाचा उद्रेक कमी झाला असला तरी ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायतींनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात विविध साथीचे आजार डोके वर काढतात. तसेच पावसामुळे दलदल निर्माण होऊन डासांचा उपद्रव वाढतो. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतींनी औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.