बीड : दुष्काळ जाहीर करा नाही तर रस्त्यावर उतरणार असा इशारा दिल्यानंतर आज सरकारने दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ' दुष्काळसदृष्य स्थिती' याचा समाचार घेत ठाकरे यांनी, दुष्काळी उपायांच्या कामाला खरी सुरुवात होईल, तेव्हा सरकारचे आभार मानू तोपर्यंत ‘आभार सदृष्य धन्यवाद’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
बीड येथे शिवसेनेच्या गटप्रमुख, बूथप्रमुख, शाखा प्रमुख तसेच आजी- माजी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार कुठलाही विषय आली की चर्चा करत बसते, दुष्काळ जाहीर करायला मुहूर्त काढायचा काय? दुष्काळ जाहीर करायला सरकार विलंब लावत असेल तर लोकशाही मार्गाने हे सरकार पुढे जाईल असे वाटत नाही असेही ठाकरे म्हणाले.
मला शिवसेनचा मुख्यमंत्री करायचा आहे ३० वर्षानंतर हिंदू सरकार सत्तेवर आले. मजबूत सरकार आले. राम मंदिर, हिंदूत्व, समान नागरी कायद्यासाठी आम्हीही प्रचार केला, पण पदरात काही पडले नाही आणि काही पडेल वाटत नाही असे ते म्हणाले. या सरकारने भ्रमनिरास केला, आजपर्यंत सगळ्यांचे अनुभव घेतले, आता शिवसेनेचा अनुभव का घ्यायचा नाही, मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे, कारण मला राज्य उभारायचे आहे, असेही ठाकरे म्हणाले.
जनता सरकार विरोधी मी सरकारचा विरोधक नाही, जनतेच्या बाजुने भांडतोय. जनता ही सरकारविरोधी असेल तर आम्ही काय करणार? अशी भूमिका मांडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर मराठवाडा संपर्क प्रमुख खा. चंद्रकांत खैरे, मंत्री अर्जनु खोतकर, मिलींद नार्वेकर, जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक आदंसह पदाधिकारी उपस्थित होते.