अंबाजोगाई : प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपातून ठाकरे गटाच्या फायरब्रॅण्ड नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह पाच जणांची अंबाजोगाई सत्र न्यायालयाने शनिवारी (दि.१८) सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यामुळे सुषमा अंधारे यांना दिलासा मिळाला आहे.
दोन वर्षापूर्वीचे हे प्रकरण आहे. फिर्यादीनुसार, २९ जानेवारी २०२१ रोजी रात्री रविराज दत्तराव गुट्टे, गणेश मोहन जाधव, विशाल दत्तराव गुट्टे, धनराज दत्तराव गुट्टे आणि सुषमा दगडूराव अंधारे या पाच जणांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून काठ्या, चाकू घेऊन फिर्यादीच्या विद्यानगर येथील घरावर हल्ला चढविला. फिर्यादीच्या घरात घुसून त्यांनी महिलेचा विनयभंग करत दोन महिलांसह चौघांवर चाकू, काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला. यावेळी सुषमा अंधारे यांनी उर्वरित चार आरोपींना विनयभंग आणि जीवे मारण्यासाठी चिथावणी दिली. सदर फिर्यादीवरून पाचही आरोपींवर कलम ३०७, ३५४, ४५२, १०९, १४३, १५५, ३२३, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या प्रकरणाची सुनावणी अंबाजोगाई अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. व्ही. के. मांडे यांच्या न्यायालयासमोर झाली. यावेळी एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. मांडे यांनी सबळ पुराव्याअभावी पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. अजित लोमटे यांनी काम पाहिले. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्या लक्ष लागले होते.