लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : खरीप हंगामात जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी उसनवारी करून मूग, उडीद, सोयाबीनचा घेतलेला ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पूर्ण पेरा पावसाअभावी वाया गेला आहे. यामुळे शेतकरी हताश झाला आहे.
आष्टी तालुक्यात खरीप हंगामातील पेरण्या उरकून घेण्यासाठी शेतकरी पावसाची वाट पाहत होते. जूनमध्ये वेळेवर पडलेल्या पावसाने आशा दाखविल्याने उसनवारी करून शेतकऱ्यांनी उडीद, मूग, सोयाबीनचा ५० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा केला होता. मध्यंतरी पाऊसही चांगला झाला. आता मोठ्या प्रमाणावर उतारा मिळणार अशी आशा वाटत होती; पण नंतर पावसाने दडी मारल्याने ही पिके जळून गेली. शासनाकडून या पिकांचे पंचनामे करून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
.....
५० टक्के पेरा धोक्यात
आष्टी तालुक्यात कृषी विभागाकडून खरीप हंगामातील उडीद, मूग, सोयाबीनसह अन्य पिकांचा पेरा झाला होता. एकूण खरिपाच्या पेरणीपैकी ५० टक्के पेरा धोक्यात आला असल्याचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
....
170821\162620210817_103202_14.jpg
पावसाअभावी करपलेले सोयाबीन पीक