परळी ( बीड ) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासूनच राज्याच्या कानाकोपर्यातून कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर अलोट गर्दी केली होती. विविध भागातून रथ, दिंडी, पताका, टाळ मृदंगासह येत मुंडे अनुयायी समाधी स्थळावर पोहोचले. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी कुटूंबियांसह गडावर उपस्थित राहून सर्वाचे अभिवादन स्विकारले. दरम्यान, वैद्यनाथ कारखान्यातील दुर्घटनेत मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने जयंतीदिनी आयोजित केलेले सामाजिक उपक्रमांचे सर्व कार्यक्रम रद्द करून जयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला होता.महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून मुंडे अनुयायी लाखोंच्या संख्येने लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गोपीनाथ गडावर जमा झाले होते. भगवानगडाहून आलेली भगवानगड ते गोपीनाथ गड, नांदेड येथून हनुमान गड ते गोपीनाथ गड अशी अॅड. रमेश धात्रक यांची रथयात्रा आणि शिखर शिंगणापूर ते गोपीनाथ गड अशी डाॅ. राजेंद्र खाडे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष ज्योत घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने गडावर आले होते. या दोन्ही यात्राचे ना. पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी स्वागत केले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीसमोर लाखो अनुयायांनी सकाळपासूनच नतमस्तक होण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी ना. पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे, प्रज्ञा मुंडे, डाॅ. अमित पालवे, अॅड. यशश्री मुंडे, अगस्त्य खाडे आदी कुटूंबातील सदस्यांनी मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. वैद्यनाथ साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी राज्याचे पशूसंवधर्न व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आ. आर. टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, आ. भीमराव धोंडे, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आमदार केशवराव आंधळे, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, ज्येष्ठ नेते फुलचंद कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, राधाताई सानप, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदित्य सारडा, बंजारा नेते मांगीलाल चव्हाण, कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, रामराव खेडकर, धम्मानंद मुंडे, भास्कर रोडे, विजय गोल्हार, संतोष हंगे, नगराध्यक्ष स्वरूपसिंह हजारी, सहाल चाऊस, अजित वरपे, विजयकुमार बंब, नरेंद्र कांकरिया, दिलीप खिस्ती आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.