परळी (बीड) : तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या कार्यालयात आज सकाळी जीएसटी विभागाचे पथक धडकले. कारखानाच्या जुन्या व्यवहाराप्रकरणी जीएसटी विभागाकडून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती आहे.
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आहेत. आज सकाळी जीएसटी विभागाचे पथक पांगरी येथील कार्यालयात तपसणीसाठी धडकले. कारखाना जानेवारी महिन्यापासून बंद असल्याने कार्यालयास कुलूप होते. तीन गाड्यांमधून तब्बल १० अधिकारी सकाळीच कार्यालयात दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सकाळी कार्यालय उघडायला लावले असे समजते. कर्जामुळे कारखाना जानेवारीपासून बंद ठेवण्यात आला आहे. सध्या सुरक्षा कर्मचारी वगळता कारखान्यात कुठल्याच विभागाचे कर्मचारी कार्यरत नाहीत. जीएसटी अधिकारी वैद्यनाथ कारखान्याच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करत असल्याच्या माहितीने खळबळ उडाली आहे.
जीएसटी पथकास सहकार्य वैद्यनाथ सहकारी कारखाना आर्थिक अडचणीमुळे बंद आहे. अचानक आज जीएसटी अधिकारी आले. त्यांना जे कागदपत्र हवे होते ते उपलब्ध करून दिले आहेत. कारखान्याचे कर्जही काही प्रमाणांत फेडलेले आहे- पंकजा मुंडे, चेअरमन, वैद्यनाथ साखर कारखाना