बीड : कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेत प्रशासनातील प्रत्येक घटकाने गांभीर्यपूर्वक काम करावे, कोरोनाविरूद्धची ही लढाई निकराची असून, पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. जिल्ह्यात कुठेही बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडीसीविर किंवा अन्य कोणत्याही बाबींची कमतरता भासणार नाही, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता असून लॉकडाऊन टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
जिल्ह्यातील कोविड परिस्थिती व उपाययोजना संदर्भात जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व सर्व विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक सोमवारी झाली. यावेळी पालकमंत्री बोलत होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, मृत्यूदर देखील वाढला असून, योग्य उपचार, बेडची उपलब्धता यासह ऑक्सिजन, रेमडीसीविर इंजेक्शनची वेळेवर व रास्त भावात उपलब्धी या सर्वच बाबींवर पालकमंत्री मुंडेंनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
यावेळी आ. सुरेश धस, आ.बाळासाहेब आजबे, आ. संजय दौंड, आ. नामिता मुंदडा, आ. लक्ष्मण पवार, यांनी देखील प्रशासनास विविध सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार,पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, डॉ. शिवाजी सुकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, प्रकाश आघाव पाटील यांसह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
दोन दिवसात ऑक्सिजनचे आणखी बेड वाढवा...
जिल्हा प्रशासनाकडे २५०० ऑक्सिजन बेड तयार आहेत. लोखंडी सावरगाव कोविड सेंटर येथील बेडसंख्या मागील काही दिवसात रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने कमी करण्यात आली होती. मात्र आताची रुग्णसंख्या पाहून, ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेडची संख्या तातडीने वाढविण्यात यावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
बीडमध्ये होणार कोरोना चाचणी प्रयोगशाळा
कोरोना चाचण्यांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले असल्याने, अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव प्रयोगशाळेवर ताण वाढला असून, चाचण्यांचे निकाल प्राप्त व्हायला वेळ लागतो. यामुळे बीड येथील जिल्हा रुग्णालयात देखील कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे नव्याने पाठवून तो तातडीने मंजूर करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले.
===Photopath===
120421\12_2_bed_12_12042021_14.jpg
===Caption===
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत बोलताना पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.सुरेश धस, नमिता मुंदडा आदी