बीड : उपजीविका भागविण्यासाठी पैठणहून गेवराईला आलेल्या घिसाडी समाजातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघांनी पळवून नेले. त्यानंतर गेवराई पोलिसांनी याप्रकरणाचा अवघ्या ४८ तासात छडा लावला. अपहृत मुलीची सुखरुप सुटका करण्याबरोबरच विष्णू भगवान चव्हाण या अपहरणकर्त्याला बेड्या ठोकल्या. अन्य एकाचा शोध सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सांगितले.
पैठण तालुक्यातील वाडीनांदर येथील घिसाडी समाजातील कुटुंब गेवराई तालुक्यात उपजीविका भागविण्यासाठी आले. बेलगाव येथे त्यांना काम भेटले. २४ मे रोजी राहण्यासाठी झोपडी उभी करण्याचे काम सुरु होते. याचवेळी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी लघुशंकेसाठी आडोशाला गेली. हीच संधी साधून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी तिचे सिनेस्टाईल अपहरण केले. बराचवेळ झाल्यानंतर मुलगी परत न आल्याने कुटुंबियांनी पाहणी केली असता त्यांना दुचाकीवरुन आपल्या मुलीला दोघेजण पळवून नेत असल्याचे दिसले.
त्यांनी तात्काळ गेवराई पोलीस स्टेशन गाठले. पो. नि. दिनेश आहेर, पो. उप. नि. सागडे यांना घटना सांगितली. त्यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्याबरोबरच तपासाची चक्रे गतीने फिरवली. वेगवेगळ्या माध्यमातून तपास केला असता त्यांना विष्णू चव्हाण याच्यावर संशय बळावला. त्याचा शोध घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातील शेंदूरवादा येथे बेड्या ठोकल्या. अवघ्या ४८ तासात मुलगी सुखरुप आई - वडिलांच्या स्वाधीन केल्याने त्यांच्या चेहºयावर हास्य फुलल्याचे दिसले. आरोपीकडून दुचाकी ताब्यात घेतली आहे. पो. उप नि. सागडे याचा पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई आहेर, सागडे, संतोष क्षीरसागर, अंकुश वरपे, शरद बहीरवाळ, सुसेन पवार यांनी केली.