बीड : जिल्हा रुग्णालयात मुलीऐवजी मुलाची नोंद करणाऱ्या चार परिचारिका व एका महिला डॉक्टरवरील कारवाई रखडली आहे. आरोग्य उप संचालकांच्या टेबलवर कारवाईचा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. या सर्व प्रकाराकडे सिव्हील प्रशासनही डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. तब्बल पंधरा दिवस उलटूनही कसलीच कारवाई न झाल्याने आरोग्य विभाग संशयाच्या भोवºयात अडकला आहे.
११ मे रोजी छाया राजू थिटे (रा. हिंगोली ह. मु. कुप्पा, ता. वडवणी) या महिलेने मुलीला जन्म दिला होता. परंतु रुग्णालयातील डॉक्टर दीपाश्री मोराळे तसेच शुभांगी नाईकवाडे, सपना राठोड, संगीता बनकर, सुनिता पवार या चार परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे मुलीऐवजी मुलाची नोंद झाली. हा सर्व प्रकार २१ मे रोजी समोर आला.
मूल अदलाबदल झाल्याची चर्चा राज्यभर झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय प्रशासन बदनाम झाले. शिवाय बीड जिल्हाही बदनाम झाला होता. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी चार परिचारिका व दोषी असणाºया डॉ. दीपाश्री मोराळेसह डॉ. परमेश्वर बडे, डॉ. अनिल खुलताबादकर यांचे जवाब घेतले. यामध्ये डॉ. खुलताबादकर व डॉ. बडे यांना तात्काळ कार्यमुक्त केले होते. उर्वरित ४ परिचारिका व महिला डॉक्टरावरील कारवाईचा प्रस्ताव आरोग्य उप संचालकांकडे पाठविला होता.
या प्रकरणास तीन आठवडे उलटूनही वरिष्ठ स्तरावरुन अद्याप कसलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठ कार्यालय देखील संशयाच्या भोवºयात अडकले आहे. या सर्व प्रक्रियेत दोषी परिचारिका व डॉक्टर बिनधास्त असल्याचे पाहवयास मिळत आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी आहे.वरिष्ठांशी चर्चासदरील प्रकरणासंदर्भात जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी आरोग्य उप संचालकांना भेटल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. परंतु त्यांच्यातील चर्चा समजू शकली नाही. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याशी संपर्क साधला. परंतु तो न झाल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.
जबाबात आढळली तफावतडीएनए अहवाल येण्यापूर्वी परिचारीकांनी तो मुलगाच होता, असे जबाबात ठासून सांगितले होते. त्यामुळे मुलाची अदलाबदल खाजगी रूग्णालयातच झाल्याचा संशय व्यक्त होत होता. परंतु डीएनए अहवालानंतर पुन्हा त्याच परिचारिका व डॉक्टरांचे पुन्हा जबाब घेण्यात आले. यामध्ये मुलगाच आहे, असे ठासून सांगणाºया परिचारीकांनी आपल्याकडून हे चुकून झाल्याचे सांगितले. आम्हाला माफ करावे, अशी विनंतीही त्यांनी जबाबातून केल्याचे समजते. परंतु हा सर्व प्रकार माफिलायक नसून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. आता आरोग्य विभाग काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.