माजलगाव ( बीड ) : कर्नाटकातून आलेल्या एका ट्रकमधील ३३ लाखांचा गुटखा पोलिसांनी आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास पात्रुड परिसरात पकडला. पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले असून गुटखा, ट्रक, मोबाईल असा ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे माजलगाव उपअधीक्षक पदाचा पदभार आहे. त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, कर्नाटक राज्यातून जालना जिल्ह्यात गुटख्याचा ट्रक जाणार आहे. त्यांनी याची माहिती माजलगाव ग्रामीण ठाण्यात कार्यरत सहायक पोलिस अधीक्षक रश्मिता राव यांना दिली.
यावरून राव यांच्या पथकाने पात्रुड परिसरामध्ये सापळा लावला. पहाटे तीन वाजेच्या दरम्यान पथकाने ट्रक ( के.ए. 56 - 5413 ) थांबविण्यात आला. ट्रकची तपासणी करण्यात आली असता त्यात गुटख्याची ३१ पोती आढळून आली. पोलिसांनी ट्रकसह सर्व मुद्देमाल ग्रामीण पोलीस ठाण्यात घेऊन जात गुटक्याची तपासणी करण्यात आली. यावेळी या ट्रकमध्ये गुटख्याच्या ३१ पोती आढळून आली. त्याची किंमत 33 लाख रूपये आहे.
पोलीस हवालदार बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण ठाण्यात चालकासह गुटखा मालक सिकंदर भाऊ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई प्रभारी पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार , सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक रस्मिता राव , पोना राजु वंजारे, सचिन अहंकारे, डी.वाय. मोरे ,अतिशकुमार देशमुख ,युवराज चव्हाण यांनी केली . पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल करत आहेत.