बीड : तालुक्यातील घोडका राजुरी येथे एका गोदामावर छापा टाकून पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या विशेष पथकाने सुमारे ६२ लाख ८१ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. १५ सप्टेंबर रोजी पहाटे अडीच वाजता ही कारवाई करण्यात आली. पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. दोघांना ताब्यात घेतले असून तिघे फरार आहेत.
बीड-परळी मार्गावरील घोडका राजुरी फाट्यावर एका गोदामात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून १५ सप्टेंबर रोजी पहाटे पथकप्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे व सहकाऱ्यांनी तेथे छापा टाकला. यावेळी एक ट्रक, टेम्पो व मालवाहू जीपमधून गुटखा भरून नेत असतानाच पथक तेथे धडकले. यावेळी दोन वाहनांच्या चालकांना ताब्यात घेण्यात आले. तर एका वाहनचालकाने पोबारा केला. गुटख्याचा ६२ लाख ८१ हजार ८२० रुपयांचा साठा तसेच १३ लाख रुपयांची वाहने, असा एकूण ७५ लाख ८१ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पिंपळनेर ठाण्यात गुटखा व्यापारी महारुद्र नारायण मुळे, गोदाम मालक बालासाहेब घोडके, ट्रकचालक सोमनाथ मुरलीधर वारे, मालवाहू जीपचालक रंगनाथ जगन्नाथ खांडे, ट्रकचालक दिलीप विठ्ठल घोडके यांच्याविरुद्ध कलम ३२८, ३७२, ३७३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सध्या दोन आरोपी ताब्यात असून उर्वरित तिघे फरार आहेत.
__
पोलिसांच्या आशीर्वादा‘मुळे’ माफियागिरी
दरम्यान, घोडका राजुरी येथे राजरोस सुरू असलेल्या गुटख्याच्या गोरखधंद्यात महारुद्र मुळे मुख्य आरोपी असून, पोलीस आणि स्थानिक नेत्यांकडे त्याची उठबस असते. त्यामुळे पिंपळनेर पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्याने गुटख्याचे गोदाम थाटले होते. यापूर्वी पेठ बीड पोलिसांच्या ताब्यातून गुटख्याचा टेम्पो पळविल्याच्या प्रकरणात त्याचा सहभाग आढळला होता, पण पेठ बीड पोलिसांनी खोलवर तपास न केल्याने तो सहीसलामत सुटला. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादा‘मुळे’ फोफावलेल्या माफियागिरीला या कारवाईने दणका बसला आहे.
_
150921\15bed_16_15092021_14.jpg
गुटखा