लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दोन महिन्यापूर्वी जप्त केलेला ९१ हजार रुपयांचा गुटखा गुरुवारी न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने दुपारी ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
जिल्ह्यात गुटखा बंदी असतानाही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री केली जात आहे. यावर कारवाई करण्यासाठी अन्न प्रशासनाचे अधिकारी ठोस पावले उचलत आहेत. १२ आॅक्टोबर रोजी बीड शहरातील पेठबीड भागातील इस्लामपुरा, बाबा चौकात अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर यांनी धाड टाकून ९१ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर सदरील घर व गुटखा सीलबंद केला होता.
न्यायालयाने आदेश देताच गुरुवारी दुपारी खंडेश्वरी परिसरात तो नष्ट करण्यात आला.ही कारवाई सहायक आयुक्त अभिमन्यू केरुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर, भिसे, बी.यू. शेंडगे यांनी केली. यावेळी व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी यांचीही उपस्थिती होती.