लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : अवैध व बेकायदेशीररीत्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा टेम्पो पकडून पोलिसांनी २६ लाख ७० हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. गुरुवारी दुपारी अंबाजोगाई शहराजवळील आडस फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली.अंबाजोगाई येथे नव्याने रुजु झालेल्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे, पोलीस कर्मचारी आवले एम.व्ही, प्रकाश सोळंके, नागरगोजे यांनी ही कारवाई केली आहे. गुरूवारी दुपारी लातुरहून अंबाजोगाई शहरात अवैध व बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी गोवा गुटख्याचे तीस पोते ( १८० बॅग )घेउन टेम्पो क्र एम.एच.१३ सी.यु.४५६८ येत होता. याची माहिती अंबाजोगाई शहर पोलिसांना मिळाली. तात्काळ शहर पोलीसांनी लातुर चौकात सापळा रचला.पोलिसांना पाहून टेम्पो चालक अंबाजोगाई शहरात न येता पळून जाण्यासाठी लोखंडी सावरगावकडे वळला. परंतु पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून लोखंडी सावरगावच्या पुढे आडस फाट्यानजीक त्यास गुटख्यासह ताब्यात घेतले. गुटख्याची एकूण किंमत २६ लाख ७० हजार रुपए ऐवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुटख्याची पोते,टेम्पो चालक व टेम्पो ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुटखा पकडल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास देण्यात आली. त्यांच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया पोलीसांकडून सुरू आहे.
आडस फाट्याजवळ गुटख्याचा टेम्पो पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 1:04 AM