बीड : ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले ज्ञानराधा मल्टीस्टेटचे सुरेश कुटे यांना नजरकैदेत स्वगृही ठेवण्याचा आदेश माजलगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला. कुटे यांना १४ जून रोजी सकाळी ११ वाजता हजर केले जाणार आहे.
बाबासाहेब ढेरे व अन्य १६ ठेवीदारांनी केलेल्या तक्रारप्रकरणी कुटे यांच्याविरुद्ध माजलगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ७ जून रोजी पुणे येथून कुटे यास बीड पोलिसांनी अटक केली होती. १३ जूनपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी कुटेंना न्यायालयात हजर केले होते. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. पी. एन. मस्कर यांनी बाजू मांडली.
ठेवीदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवी घेतल्या. नंतर त्या परत न दिल्याने ज्ञानराधा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत नऊ गुन्हे दाखल होते. याच अनुषंगाने बीडपोलिसांनी सुरेश कुटे यांना शुक्रवारी पहाटे पुण्यातील हिंजवडी भागातून अटक केली आहे. त्यांना माजलगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
बीडसह छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, आदी जिल्ह्यांत ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या ५२ शाखा आहेत. यामध्ये सहा लाखांपेक्षा अधिक ग्राहक असून, कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये कुटे ग्रुपच्या तिरूमला ग्रुपची आयकर विभागाकडून तपासणी झाली. त्यानंतर ठेवीदारांनी घाबरून ज्ञानराधामधील ठेवी काढून घेतल्या; परंतु मल्टिस्टेटमधील पैसे संपल्याने या ठेवी परत देण्यात कुटे असमर्थ ठरले. पैसे परत देण्यासह सुरेश कुटे यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठेवीदारांनी आंदोलने केली; परंतु तरीही काहीच कारवाई झाली नव्हती. अखेर ठेवीदारांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर गुन्हे दाखलचे आदेश दिले. त्याप्रमाणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले आहेत.