- नितीन कांबळे
कडा: तालुक्यातील ह***र कर्मचारी कार्यालयात हजर राहत नाहीत,याला आळा घालायचे सोडून गैरहजर व कामचुकार अधिकाऱ्यांची पाठराखण लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार करतात, असा संताप माजी आ.साहेबराव दरेकर यांनी बैठकीत केला.यावर, मी कुणाचं ऐकून घेयला मोकळा नाही, तुमचे जे प्रश्न आहेत ते मांडा, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करू नका असे, आ. बाळासाहेब आजबेंनी सुनावले. प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत आजी- माजी आमदारांची जुंपल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.
आष्टी तालुक्याचा मुख्य ध्वजारोहण तहसिल कार्यालयात तहसिलदार बाळदत्त मोरे यांच्याहस्ते शुक्रवारी सकाळी ९.१५ वा.करण्यात आला.यानंतर तहसिल कार्यालयात सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आ.बाळासाहेब आजबे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत माजी आ.भीमराव धोंडे, माजी आ.साहेबराव दरेकर, पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस,वाल्मिक निकाळजे यांच्यासह तालुक्यातील व्यापारी,पञकार,वकील,डाॅक्टर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीलाच ध्वजारोहणासाठी अनेक कार्यालय प्रमुख गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आल्याने माजी आ.साहेबराव दरेकर यांचा पारा चढवला. हे ह***र अधिकारी काम करत नाहीत, मुख्यालयी थांबत नाहीत,पंचायत समिती, कृषी विभाग, तलाठी हे काम करत नसल्याच्या आरोप दरेकर यांनी केला. या कामचुकार अधिकाऱ्यांकडे लोकप्रतिनिधी या नात्याने लक्ष देण्याची गरज असतांना आमदार साहेबच अशांना पाठिशी घालत असल्याचा संताप दरेकर यांनी व्यक्त केला. यावर आ. बाळासाहेब आजबे यांनीही, मी कोणाचे ऐकून घेयला मोकळा नाही, माझे प्रत्येक कार्यालयावर लक्ष आहे. अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नागरिकांचे कामांना विलंब लागतो. पण कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे कितपत योग्य आहे. अधिकाऱ्यांची बाजू घेत नाही तर सर्व परिस्थिती माहिती असल्याने जबाबदारीने बोलत असल्याचे आ.आजबे यांनी माजी आ.दरेकर यांना सुनावले. माजी आमदार भीमराव धोंडे यानी मधस्थी केल्याने दोघांचा वाद मिटला. मात्र, त्यानंतर तहसीलदार यांनी लगेच आभार प्रदर्शन व्यक्त करत कार्यक्रम संपला असे जाहीर केले.