परळी (बीड ) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे नेहमी सांगायचे सदभावना आणि विश्वासाच्या जोरावरच निवडणुका लढविता येऊ शकतात, दारू, पैसा आणि गुंडगर्दीच्या जोरावर निवडणुका जिंकणे अशक्य आहे असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडले. ' गांव तिथे विकास दौरा ' या उपक्रमाअंतर्गत त्या खोडवा सावरगाव येथे बोलत होत्या.
आज सकाळी धर्मापूरी जिल्हा परिषद गटातील खोडवा सावरगांव, दैठणा घाट, गुट्टेवाडी येथे विविध विकास कामाचे उदघाटन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या कि, पैशावर निवडणूका झाल्या असत्या तर उद्योजक सुद्धा निवडून आले असते, गुंडसुद्धा सहज जिंकले असते. दाऊद इब्राहिम पळून न जाता सत्ताधारी झाला असता पण तसे होत नाही. निवडुन यायचे असेल तर जनतेचा विश्वास आणि प्रेम याची आवश्यकता असते. असे सांगून दारू पाजणारा पाहिजे का पाणी देणारा हवा याची निवड जनतेला करावी लागणार आहे असेही त्या म्हणाल्या. यावेळी भाजपा नेते रत्नाकर गुट्टे, तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, जेष्ठ नेते जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, राजेश गिते, परमेश्वर फड, प्रा. बिभीषण फड, प्रभाकर फड अरुण दहीफळे, विनायक गुट्टे रवी कांदे, अजय गित्ते, गोविंद मुंडे गणेश होलंबे आदींची उपस्थिती होती.