एकीकडे निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडासमोर आलेला घास हिरावला जात आहे. तर दुसरीकडे शेतातील उभे पीक वन्य प्राणी फस्त करू लागले आहेत. अशा आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला. यामुळे रब्बीच्या पेरण्या धडाक्यात झाल्या. सध्या शेतात गहू, ज्वारी, हरभरा, करडई, ऊस, ही पिके मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. तर या पिकांना आता विविध संकटांबरोबरच वन्य प्राण्यांनीही ग्रासले आहे. रानडुकरे, हरीण यांचे मोठे कळप शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरू लागले आहेत. हरणाच्या कळपांनी तर तालुक्यात ठिकठिकाणी गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात फस्त केले आहे. तर रानडुकरांचा मोठा उपद्रव ऊस, ज्वारी, या पिकांना होऊ लागला आहे. तालुक्यात रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. रानडुकरांच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना परवडणारे मोठे पीक बटाटा, हळद, अद्रक, भुईमूग, ही पिके घेण्याचे टाळले जात आहे. जर एकदा रानडुकरांनी या पिकांमध्ये शिरकाव केला तर त्या शेताची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे उत्पादन मिळणारी पिके टाळण्याची वेळ रानडुकरांमुळे आली आहे.
रानडुकरांची भीती
तालुक्यात आजतागायत रानडुकरांच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महिनाभरापूर्वी कुरणवाडी येथे एक महिलेवर रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात त्या महिलेला ८० टाके घ्यावे लागले. अशा अनेक अपघाती घटना वारंवार घडू लागल्या आहेत. रानडुकरांच्या भीतीमुळे शेतात थांबणे अथवा एकटे शेतात जाणे यासाठीही शेतकरी धजावत नाहीत.
प्रशासकीय यंत्रणा उदासीन
वन्यप्राण्यांकडून शेतकरी व शेतमजुरांवर होणाऱ्या अचानक हल्ल्यांमुळे या रानडुकरांबाबत मोठी भीती निर्माण झाली आहे. रानडुक्कर अथवा हरीण यांच्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळविण्यासाठी मोठी कसरत शासन दरबारी करावी लागते. तसेच या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग अथवा प्रशासनही म्हणावी तशी दखल घेत नसल्याने आता शेतकऱ्यांना या नवीन संकटांना सामोरे जावे लागत आहे.