परळी : खरं तर गुन्हेगाराला आणि त्यातही माणसाला अटक करण्याचे पोलिसांचे काम... पण आता चक्क पोलीस गाढवालाही ताब्यात घेऊन कारवाई करू लागले आहेत, अशा स्वरूपाचा मेसेज सोशल मीडियात रविवारी व्हायरल झाला. यानंतर काही उत्सुक नागरिकांनी परळीच्या ग्रामीण पोलीस स्थानकात धाव घेतली. यावेळी स्टेशनच्या आवारातील रोपटे खाल्याने गाढवाला हाकले असल्याची माहिती पोलिसांनी देत या व्हायरल मेसेजवरील चर्चेला पूर्ण विराम दिला. मात्र या स्पष्टीकरणानंतर 'हाकले' चे झाले 'डांबले' अशी चर्चा पुन्हा सोशल मीडियात रंगली आणि पोलिसांना 'ध' चा 'मा' प्रकरणाचा अनुभव आला.
याचे झाले असे की, ''परळी ग्रामीण पोलीसांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात काही दिवसांपूर्वी वृक्ष लागवड करण्यात आली. झाडेही बर्यापैकी आले. मात्र रविवारी एका गाढवाने या परिसरात प्रवेश करत यापैकी एक रोपटे खाल्ले. लावलेले झाड खाने म्हणजे गुन्हाच! गाढवाने झाड खाल्ल्याचं समजताच ग्रामीण पोलीसांनी संबंधित गाढवाला ताब्यात घेऊन डांबुन टाकले. एव्हढेच नव्हे तर त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी एका जमादाराची नियुक्तीही करण्यात आली'' अशा स्वरूपाचा मेसेज रविवारी शहरात सोशल मीडियात व्हायरल झाला. पोलीसांनी गाढवाला ताब्यात घेतल्याची बातमी शहरात पसरली आणि आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले.
यानंतर काही उत्सुक नागरिक तर चक्क गाढवाची जमानत घेण्यासाठी पोलीसात गेले. मात्र येथे आल्यास पोलिसांनी डोक्यावर हात मारत झालेल्या प्रकारचा उलगडा केला. झाडाचा पाला खात असल्यामुळे गाढवाला बांधून ठेवले नसून हाकलून लावले होते. या दरम्यान, परिसरात उभ्या गाढवाचा कोणीतरी फोटो काढून चुकीची माहिती सोशल मीडियात व्हायरल केली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
एका गाढवास परळी ग्रामीण पोलिसांनी झाडाचा पाला खात असताना हाकलून लावले पण डांबले नाही. दुसरी काहीही कारवाई करण्यात आली नाही. गाढव थांबलेले असताना फोटो कोणी तरी काढून चुकीची माहिती व्हायरल करण्यात आली आहे. या संदर्भांत सोशल मीडियावर व्हायरल झालेला मेसेज खोडसाळपणा आहे.- शिवलाल पुर्भे, पोलीस निरीक्षक,परळी ग्रामीण पोलीस ठाणे