माजलगाव : तालुक्यातील केसापुरी येथील शेतकऱ्याने अनुभव नसताना प्रथमच अर्ध्या एकर शेतात टरबुज व खरबुजाचे पीक घेऊन हे शेतातूनच विक्री करत एक लाखाचे उत्पन्न मिळवले.
खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर माजलगाव - सादोळा या गावच्या मध्यभागी रस्त्याच्या कडेला केसापुरी येथील मोहम्मद शरीफ देशमुख यांची पावणेचार एकर शेती असून, या ठिकाणी असलेल्या बोअरच्या पाण्यावर आतापर्यंत ऊस, कापूस, गहु, हरभरा यांसह अनेक पिके त्यांनी घेतली होती. या ठिकाणी दोन एकर ऊस असून, कापसाचे पीक मोडून गहू पेरायचा होता; परंतु गहू पेरणीस उशीर झाल्याने गव्हाऐवजी टरबुज व खरबुजाची लागवड करण्याचा निर्णय मोहम्मद देशमुख व त्यांच्या पत्नीने घेतला. टरबुज व खरबुजाचे पीक घ्यायचे म्हटल्यावर एखाद्या भोयास बोलावून त्याला वाट्याने दिल्यास निम्मे उत्पन्न त्याला गेल्यास आपणांस काय शिल्लक राहील, याचा विचार करत स्वतःच टरबुज व टरबुजाची लागवड केली. पाहता-पाहता हे पीक बहरले. दोन अडीच महिन्यात याला चांगली फळे बहरली. ही फळे खायला पण गोड व चविष्ट असल्याने या राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी ही फळे खरेदी केली. यामुळे कोण्या व्यापाऱ्यांकडे जावुन मस्का मारण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली नाही व पाहता -पाहता ही फळे संपण्याच्या मार्गावर असल्याचे या शेतकऱ्याने सांगितले.
आतापर्यंत या शेतकऱ्याला खरबुजातून ३० हजार रुपये व टरबुजातून ५० हजार रुपये मिळाले तर आणखी २० ते २५ हजाराचे टरबुज निघण्याची शक्यता आहे. या टरबुज व खरबुज लागवडीनंतर आतापर्यंत याला २० हजार रुपये खर्च आला असल्याचेही या शेतकऱ्याने सांगितले.
हिम्मत केल्याने अनुभव आला
माझी टरबुज व खरबुज लागवडीची पहिलीच वेळ होती. अनुभव नसतानाही शेतकऱ्यांनी हिम्मत केल्यास व ते पिकवत विक्री केल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. याचा मला चांगलाच अनुभव आला.
---मोहम्मद देशमुख, टरबुज व खरबुज उत्पादक शेतकरी.
===Photopath===
130421\img_20210411_125143_14.jpg~130421\img_20210411_125245_14.jpg