लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बुधवारी दुपारी बीडसह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावल्याने नागरिक सुखावले. मात्र पावसाचे आणि गटारींचे पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.बीडमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सूर्यदर्शन झाले नाही. दुपारी २ वाजेच्या सुमारास शहर आणि परिसरात दमदार पाऊस झाला. अर्धा तास बरसलेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले. गटारी मरुन वाहिल्या. तुंबलेल्या गटारींचे पाणीही रस्त्यावर आले. त्यामुळे अनेकांची फजिती झाली. म्हाळस जवळा परिसरातही पावसाने हजेरी लावली. मंजरसुंबा, पाली परिसरातही पावसाचे वृत्त आहे.गेवराई शहरासह तालुक्यातील धोंडराई, चकलांबा, तलावाडा, जातेगाव, मादळमोही, पाडळसिंगी तसेच परिसरात दुपारी एकच्या सुमारास पाऊस झाला. परळीत पहाटेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. अंबाजोगाईत २० मिनिटे चांगला पाऊस झाला. आष्टीत मंगळवारनंतर बुधवारीही पाऊस झाला. माजलगावातही दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सांडपाणी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर गुडघाभर साचले होते. मुख्य रस्त्यासह मोंढा भागातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची फजिती झाली. पाटोदा व शिरुर तालुक्यात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी सौम्य पावसाने हजेरी लावली.पावसामुळे गाडीतच केला सत्कारबीड येथून लातूरकडे जाताना मार्ग बदलून खा. शरद पवार माजलगाव येथे आले होते. आंबेडकर चौकात सत्काराचे नियोजन होते. मात्र, पावसामुळे त्यांना बाहेर उतरता आले नाही. गाडीतच त्यांचा सत्कार करण्यात आला.
अर्धा तास पावसाने दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:11 IST