गेवराई : तालुक्यातील गेवराई ते चकलांबा या राज्यमार्गावर पौळाचीवाडी येथील रस्त्याची व पुलाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पूल आणि रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत मंगळवारी रोजी सरपंच युवराज जाधव यांनी ग्रामस्थांसह सार्वजनिक बांधकाम उपविभाग गेवराई येथील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले.
तालुक्यातील मुख्य रस्ता असलेल्या गेवराई ते चकलांबा या राज्यमार्गावर मोठे गावे आहेत. याच रस्त्यावरील पौळाचीवाडी येथील रस्त्याची व पुलाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्यामुळे ग्रामस्थांना मुख्य रस्त्यावर चिखल तुडवत जावे लागते. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता व पुल करावा या मागणीसाठी सरपंच व ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा सार्वजिक बांधकाम विभागात निवेदने दिले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
यामुळे मंगळवारी सकाळी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सरपंच युवराज जाधव व ग्रामस्थांच्यावतीने अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मैदाड यांना निवेदन दिले. यावेळी सदरील रस्ता तात्काळ दुरुस्त करावा नसता यापुढे आणखी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात सरपंच जाधव यांच्यासह राजेंद्र जाधव, कृष्णा जाधव, बंधू घाडगे, गणेश वडते, दिलीप राठोड, रमेश राठोड, सतिष राठोड, पांडुरंग मुळे, बंडू शेंडगे, अमोल राठोड, कृष्णा राठोड, अनील राठोड, सतिष राठोड, संतोष जाधव, अशोक राठोड, दत्ता जाधव, काळू जाधव, नारायण धुमाळ, नवनाथ तौर, सिद्धू पौळ, बंडू जाधव आदी ग्रामस्थांचा सहभाग होता.