गेवराई : राज्य मार्गावरील गेवराई ते चकलांबा रस्त्यावर पौळाचीवाडी येथील रस्त्याची व पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभागाच्या चुकीमुळे गावातील नालीचे व पावसाचे पाणी रस्त्यावरच तुंबल्याने रस्त्याला तलावाचे स्वरुप आले आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह प्रवासी तसेच पौळाचीवाडी ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी ग्रामपंचायतीने मुरुम टाकून पाणी काढून देण्याचा प्रयत्न केला, परंतु पुलाच्या नळ्यांची मोडतोड झाल्याने त्याठिकाणाहून पाणी जात नाही. तरी याबाबत सरपंच युवराज जाधव यांनी वेळोवेळी सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. मात्र संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने मंगळवारी गेवराई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सरपंच युवराज जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविण्यात आला. या सरपंच युवराज जाधव, ग्रामस्थ राजेंद्र जाधव, कृष्णा जाधव, बंडू घाडगे, गणेश वडटे, दिलीप राठोड, रमेश राठोड, सतीश राठोड, पांडुरंग मुळे, बंडू शेंडगे, अमोल राठोड, कृष्णा राठोड, अनिल राठोड, सतीश राठोड, संतोष जाधव, अशोक राठोड, दत्ता जाधव, काळू जाधव, नारायण धुमाळ, नवनाथ तौर, सिद्धू पौळ, बंडू जाधव आदी ग्रामस्थ आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
आठवडाभरात दुरूस्ती करणार
पौळाचीवाडी येथील रस्त्यावर साचलेले पाणी आठ दिवसांत रस्त्याच्या बाजूने काढून देण्यात येईल. तसेच हा रस्ता व पूल लवकर दुरुस्त करण्यात येईल असे आश्वासन बांधकाम विभागाचे उपअभियंता भास्कर मैंदाड यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर सरपंच युवराज जाधव यांनी आंदोलन मागे घेतले.
240821\img-20210824-wa0186_14.jpg