आष्टी तालुक्यावर दुष्काळाचे सावट ; सोळा तलावातील पाणी जोत्याखाली
नितीन कांबळे / लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : जून महिन्याच्या अगदी सुरुवातीला म्हणजेच मृग नक्षत्रात आष्टी तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या वेळेत उरकून घेतल्या. मात्र त्यानंतर तब्बल दोन महिने झाले तरीही रिमझिम पाऊस सोडता मोठा पाऊस न झाल्याने तालुक्यातील पाच प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तर सोळा प्रकल्पातील पाणी जोत्याखाली गेले आहेत. यामुळे सध्या तरी तालुक्यावर दुष्काळाचे सावट येते की काय अशी स्थिती आहे.
कायम दुष्काळाशी सामना करणारा तालुका अशी ओळख निर्माण झाली आहे. सुदैवाने सलग दोन वर्षे तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले नाही. मात्र कोरोनाच्या काळात चारा, पाणी टंचाई न जाणवल्याने प्रशासनालाही दिलासा मिळाला होता. गतवर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने पाणी, चारा टंचाई जाणवली नाही. मात्र यंदा तालुक्यातील १ लाख २६ हजार ४२४ क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. अद्याप जेमतेम पाऊस झाला असला तरी बहुतांश भाग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अनेकांची पिके उगवली नाहीत तर काही ठिकाणी जे उगवले ते कोमेजून गेले आहेत. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. तो मोठ्या पावसाची वाट पाहत आहे.
मृग, रोहिणी नक्षत्रातील एक-दोन पाऊस सोडता तालुक्यात दमदार पाऊस अद्यापपर्यंत कोठेही झालेला नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये तलावामधील पाणी पातळी खाली गेली आहे.
.....
सीना धरणात १४ टक्के पाणी, रूटी तलाव ही आटला
सध्या तालुक्यात २२ पैकी १५ लघुपाटबंधारे प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर पाच तलाव कोरडेठाक आहेत. याशिवाय सहा मध्यम प्रकल्प मधील इतर तलावांमध्ये अल्प पाणीसाठा आहे. येणाऱ्या काळात दमदार पाऊस होईल या आशेवर बळीराजा पावसाची वाट पाहत आहे. तर आष्टी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रुटी मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी जोत्याखाली गेली आहे. त्यामुळे आष्टीकरांची काळजी वाढली आहे. कर्जत हद्दीवर असलेल्या सीना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने या सीना धरणात अवघा १४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
....
मंडळनिहाय पाऊस (मिलीमीटरमध्ये)
आष्टी : १३४,
कडा : ११२
टाकळसिंग : १०४
दौलावडगाव : ११६
धानोरा :८०
धामणगाव : ९१.
....
लघु प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा
वेलतुरी व केळ हे दोन तलाव वगळता तालुक्यातील पांढरी, ब्रम्हगाव, किन्ही, चोभा निमगाव, बेलगाव, लोणी पिंपळा, मातकुळी, सिंदेवाडी, खुंटेफळ, कोयाळ, सुलेमान देवळा, धामणगाव हे तलाव जोत्याखाली आहेत. तर पारगाव मधील दोन, बळेवाडी, पिंपरी घुमरी, जळगाव हे पाच तलाव कोरडेठाक आहेत.
....
मध्यम प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा (टक्केवारीत)
मेहकरी :२२
कडा: ९
कडी: २२ रुटी
इमनगाव - जोत्याखाली
तलवार : ०.३०
कांबळी: ६ टक्के.
एकूण सरासरी पाणीसाठा : १४ टक्के.