अंबाजोगाई - शेतकरी आणि निराधारांच्या मागण्यांसाठी युवा आंदोलनाच्या वतीने अंबाजोगाईत मंगळवारी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. हल्लाबोल मोर्चातील घोषणांनी शहर दणाणून गेले.
मजुरांच्या हाताला काम द्या, मजुरांना अनुदान द्या, दुष्काळ जाहिर करा, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे अनुदान तीन हजार रूपये करा, विधवा, परित्यक्तांना घरकुलांचा लाभ द्या, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालयातील रूग्णांना मोफत औषधींसह रक्ताच्या व विविध चाचण्या मोफत करा, गायरान जमिनीचे पंचनामे करा व गायरान धारकांचे नावे सातबारा द्या, मजुरांना मोफत अन्य धान्य पुरवठा करा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. युवा आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके, धिमंत राष्ट्रपाल, संजय तेलंग, धम्मानंद कासारे, राहुल जोगदंड, सुनिल धिमधिमे, दत्ता उपाडे, अविनाश दोनगहु, लक्ष्मण दोनगहु, विनोद वैरागे, भाऊसाहेब उपाडे, अंबादास उपाडे,सुहास जोगदंड,बालासाहेब बलाढे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.