बीड : चौपदरीकरणात गेलेल्या जमिनीचा मावेजा मंजूर करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून मुकुंद पद्माकर पंडित व त्याच्यासाठी काम करणारा टपरीचालक सुनील आप्पासाहेब बडे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता रंगेहाथ पकडले. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथील एका शेतकऱ्याची जमीन धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित केली होती. निकषानुसार त्यांना तब्बल ३५ लाख रुपये मिळणार होते. दरम्यान, मावेजा मंजूर करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे बीड येीिल उपविभागीय कार्यालयातील अवव्ल कारकून मुकुंद पंडित याने एक टक्क्यांप्रमाणे ३५ हजार रुपयांची मागणी केली. त्याकरता त्यांचा मावेजाही रोखून धरला होता. ३० हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यानच्या काळात शेतकऱ्याने लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार उपअधीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भाऊसाहेब गुंजकर, गजानन वाघ व कर्मचाऱ्यांनी सापळा लावला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एका पानटपरीवर पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार शेतकरी तेथे आला. पंडित याने पैसे टपरीचालक बडे याच्याकडे देण्यास सांगितले. बडे याने पैसे स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही झडप मारुन पकडले. उशिरापर्यंत शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.या कारवाईत पोहेकॉ श्रीराम खटावकर, बाबासाहेब केदार, विकास मुंडे, सुशांत सुतळे, राकेश ठाकूर, प्रदीप वीर, पुरुषोत्तम बडे मनोज गदळे यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
अव्वल कारकुनासह एक अटकेत
By admin | Published: August 25, 2016 12:38 AM