अंबाजोगाई : तालुक्यात मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदल व रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे सगळीकडे धूळ आहे. व्हायरल फिव्हर तसेच सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास अशा विविध आजारांनी नागरिक हैराण झाले असून, रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. कोरोना संसर्ग तर नव्हे ना? अशी भीती नागरिकांमध्ये आहे.
------------------------------------
ग्रामीण भागात अद्याप बसफेऱ्या नाहीत
अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक भागात राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या अजूनही सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो. याठिकाणी शासनाने दिलेल्या निकषांचे पालन केले जात नाही. त्यामुळे गर्दी वाढू लागली आहे.
-------------------------------
पोलीस भरती प्रशिक्षण राबवावे
अंबाजोगाई : गृह विभागाने पोलीस भरती घेण्याची घोषणा केली आहे. तसेच सैन्यभरतीची जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक या भरतीत सहभागी व्हावेत, या उद्देशाने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर राबविण्यात यावे, अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांकडून होत आहे.
------------------------------------
बसमध्ये तिकीट ट्रेचा वापर
अंबाजोगाई : महामंडळाने तंत्रज्ञानाच्या युगात पाऊल टाकत तिकिटे फाडण्यासाठी नवी मशीन आणली होती. त्या मशीनद्वारे वाहक तिकीट फाडत होते; मात्र काही वर्षातच या मशीनमध्ये बिघाड झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा जुन्या तिकीट ट्रेचा वापर सुरू आहे. काही मशीन चार्जिंग करण्यासाठी चार्जर नसल्याने बंद आहेत.
--------------------------- -
ग्रामीण भागात ऑटो व्यवसाय संकटात
अंबाजोगाई : ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी बेकारीवर मात करण्यासाठी ऑटो व्यवसाय सुरु केला. मात्र, पुरेसे प्रवासी मिळत नसल्यामुळे ऑटो व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न सध्या ऑटो चालकांना पडला आहे.