बीड : शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील नाल्यांची वेळेवर साफसफाई होत नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. धान्य गोदामाच्या जागेवर परिसरातील नागरिक तसेच व्यापारी कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी सुटून आरोग्य धोक्यात येत आहे.
वाहतुकीला अडथळा
माजलगाव : तालुक्यातील टाकरवण ते टाकरवण फाटा रस्त्याच्या कडेला टाकलेले खडीचे ढिगारे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. ढिगारे टाकण्यात आले. मात्र, अद्यापही या रस्त्याची दुरुस्ती नाही. रस्ता दुरुस्त करून ढिगारे उचलण्याची मागणी होऊ लागली आहे.
चोऱ्या वाढल्या
पाटोदा : शहरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच बसस्थानक परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शहरात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. मात्र, पोलीस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांनी लक्ष द्यावे, असा सूर नागरिकांमधून निघत आहे.
मोबाइलला रेंज मिळेना
माजलगाव : तालुक्यातील टाकरवण, तालखेड भागात काही दिवसांपासून इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महत्त्वाची कामे अडकत असल्याने संताप व्यक्त होत आहे. तक्रारी करूनही संबंधित दखल घेत नाहीत. रेंज मिळण्यासाठी दुरुस्तीची मागणी आहे.
हातगाडे रस्त्यावर
गेवराई : शहरातील मुख्य रस्त्यांवर सातत्याने हातगाडे लावण्यात येत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाने हातगाडे रस्त्याच्या बाजूला न लावता पाठीमागे सरकून लावण्यासाठी कारवाई करावी व रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.
विजेचा लपंडाव सुरूच
वडवणी : शहर व परिसरात महावितरणच्या गलथान कारभारामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. याचा शहरी व ग्रामीण भागाला मोठा फटका बसत आहे. सध्या रबी हंगाम सुरू झाल्याने पिकांना पाणी देणे सुरू आहे. मात्र, वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.