बीड : पतीने घेतलेले उसणे पैसे परत कर अन्यथा तू माझ्यासोबत चल...असे म्हणत भाजीविक्रेत्या महिलेस मारहाण करून दोनवेळा भररस्त्यात छेड काढली. मात्र, दोन्हीवेळा शिवाजीनगर पोलिसांनी जुजबी कारवाई केली. त्यामुळे पीडितेने १२ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे थेट जीवन संपविण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
पीडित ३८ वर्षीय महिला मूळ चिंचवण (ता.वडवणी) येथील रहिवासी असून, सध्या शहरातील मित्रनगरात राहते. घरात पती, दोन मुले व एक मुलगी आहे. त्या गाड्यावर भाजीपाला विक्री करतात. जून २०२१ मध्ये पतीकडील उसण्या पैशावरून सीतारात प्रभू बडे (रा.मित्रनगर) याने छेड काढून गुंडांच्या साहाय्याने दाबदडप केली. त्यामुळे २२ जून रोजी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली असता केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्याने पुन्हा गाड्यावर येऊन मारहाण करून लज्जास्पद भाष्य केले. यावेळी पतीने त्याच्या तावडीतून सोडवले.
त्याच्याविरुद्ध पुन्हा तक्रार दिली असता शिवाजीनगर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदविला. विनयभंगाचा गुन्हा नोंदवून त्यास जेरबंद करावे, अन्यथा २० सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा पीडितेने दिला आहे.
...
म्हणे, पोलीस काहीच करू शकत नाहीत
पीडितेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीताराम बडे याने पोलीस माझे काहीच करू शकत नाहीत, असे म्हणून तू कोठेही जा तुला व तुझ्या पतीला सोडणार नाही, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. कुटुंबास न्याय द्या, अन्यथा जीवन संपविण्याची परवानगी द्या,
असे त्यात नमूद आहे.
...
कोट
आरोपी वारंवार धमकावत असेल व छेडछाडीची तक्रार असेल तर चौकशी करतो. योग्य ती कार्यवाही केली जाईल. पीडितेवर अन्याय होऊ देणार नाही.
- साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर, ठाणे
....