बीड : बँकेतील रकमेच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सामान्यांच्या कष्टाचा पैसा दुसऱ्याच्या नावावर वळविला जात आहे. बीडमधील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील आयसीआयसीआय बँकेत हा प्रकार घडल्याचे गुरूवारी समोर आले आहे. खातेदाराची स्वाक्षरी, फोटो अथवा इतर कागदपत्रांची कसलीही खात्री न करताच दुसऱ्याच्या खात्यावर २० हजार रुपये वळविल्याने पैसे असुरक्षित असल्याचे उघड झाले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयातही तक्रार दिली आहे.
बीड शहरातील आयसीआयसीआय बँकेत संतोष सुभाष हरणमारे यांचे १०९६०१५०१९७४ या क्रमांकाचे खाते आहे. हरणमारे हे जिल्हा रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी आहेत. याच खात्यावर त्यांचे वेतन जमा होत होते. परंतु २०२१मध्ये त्यांनी दुसऱ्या बँकेत वेतन जमा करण्यास सुरूवात केली. त्यामुळे या खात्याकडे दुर्लक्ष झाले. याचा गैरफायदा बजाज फायनान्स व बँकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला. जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या दुसऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याने मोबाईल घेतला होता. त्याचा हप्ता हरणमारे यांच्या खात्यातून जमा केला जात होता. बँक अधिकाऱ्यांनी खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांकही बदलला. त्यामुळे संदेश येणेही बंद झाले होते. याबाबत त्यांनी बँकेत धाव घेतल्यावर हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आला. हा सर्व प्रकार पाहून त्यांनाही धक्काच बसला. त्यांनी याबाबत विचारणा केल्यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शिवाय तक्रार केल्यावरही त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. म्हणून हरणमारे यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. या प्रकाराने बँकेतील पैशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तक्रार फलकावरील संपर्क हटविलेबँक अथवा बँकेशी संबंधित काही तक्रार असल्यास ती कोठे करावी, कशी करावी, याबाबत बँकेतच एका भिंतीवर बोर्ड आहे. परंतु लोक तक्रार करतील, या भीतीने येथील अधिकाऱ्यांनी फलकावरील संपर्क क्रमांकच हटविले आहेत. त्यामुळे हरणमारे यांच्यासारख्या अनेक ग्राहकांसोबत असेच प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बँकेच्या या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मी जिल्हा परिषदेत बैठकीला आलाे आहे. या प्रकरणाबाबत मी तुम्हाला नंतर कॉल करून सांगतो.- सुनील बिदाडा, शाखा व्यवस्थापक
माझ्या खात्यावरील जवळपास २० हजार रुपये रक्कम परस्पर काढली असून, माझी फसवणूक झाली.- संतोष हरणमारे, तक्रारदार