- नितीन कांबळे कडा (बीड): वडिलांनी 40 वर्ष भंगार विक्रीचा व्यवसाय करून मुलाचे शिक्षण केलं तर आईनी मंजूरी करून कुटुंबाचा गाडा चालवला. तीन मुलांची शिक्षण कसेबसे करून मोठ्या मुलाला दादासाहेब यास आरटीओ अधिकारी बनवण्याचा पराक्रम आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव येथील भंगार विक्री करणाऱ्या सुदाम गाडे यांच्या कुटुंबांनी करून दाखवला आहे. अशाच या कुटुंबाची ही यशोगाथा.
आष्टी तालुक्यातील वटणवाडी निमगावच्या मध्यभागी असलेल्या झोपडपट्टी परिसरात राहणारे सुदाम गाडे यांचे पत्नी, तीन मुले असे पाच जणांचे कुटुंब आहे. गाडे मागील चाळीस वर्षापासून भंगार विक्रीचा व्यवसाय करत. यातूनच त्यांनी कुटुंब चालवत आपल्या तिन्ही मुलांचे शिक्षण केले. दादासाहेब गाडे यांनी पहीली ते दहावी कानिफनाथ विद्यालय निमगाव येथे केले तर महाविद्यालयीन शिक्षण श्रीराम जुनियर कॉलेज कडा तर मेकॅनिकल इंजिनिअरचे शिक्षण विखे-पाटील इंजीनियरिंग कालेज अहमदनगर येथे पूर्ण केले. तर पुढे काही दिवस नारायणगाव येथे एका कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. हे करत असतानाच विविध स्पर्धा परीक्षा देणे त्याने सुरूच ठेवले. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गतवर्षी घेतलेल्या परीक्षेचा निकाल काल परवा लागला. यात देशात 23 तर महाराष्ट्रात 66 तर एसटी प्रवर्गातून महाराष्ट्रामध्ये तिसरा येण्याचा मान दादासाहेब गाडे याने मिळवला आहे.
कष्टाची जाण ठेवली आईवडिलांनी केलेल्या कष्टाची जाण ठेवून अभ्यास केला. आई-वडील, शिक्षकांनी मला घडवले. त्यामुळे हे शक्य झाले, अशा शब्दात दादासाहेब गाडे याने मिळवलेल्या यशाबद्दल आष्टी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
वडील म्हणाले एक दिवस झेंडावंदनला कपडे घ्यायला पैसे नव्हते...एक दिवस असा होता की माझ्याकडे मुलांना कपडे घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. पण बायको रातभर भाडल्याने सकाळी उठून बाहेर गेलो, मित्राच्या पाया पडून कसेबसे पैसे घेऊन दुकानातून कपडे आणले. त्यानंतर मुलं शाळेत गेले. यावेळी बोलताना सुदाम गडे यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.
आई म्हणाली जीवनाचं सार्थक झालं..दादासाहेब याने स्वतः शेतामध्ये काम केलं, वडिलांनी भंगार विक्रीचा व्यवसाय केला तर भावांनी गवंड्याच्या हाताखाली काम करत कुटुंबाला हातभार लावला. मोलमजुरी करून मुलाला शिकवलेल्या कामाचं चीज झालं, इतका आनंद झालाय की, सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया आई संजानाबाई यांनी दिली.
आमच्या गावाच भूषण एका भंगार विक्री करणाऱ्या कामगाराचा मुलगा जर आरटीओ होत असेल तर दुसऱ्या युवकांनी सुद्धा आपण काहीतरी करायला पाहिजे, याचा एक आदर्श दादासाहेब गाडे यांनी आमच्या गावातील तरुणांसमोर निर्माण केला आहे. त्यामुळे सर्वांना दादासाहेबचा अभिमान वाटत आहे. तो आमच्या गावच भूषण आहे, असे माजी उपसरपंच विजय शेळके यांनी सांगितले.