बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी खेडोपाडी पक्षाचे कमळ हे चिन्ह कसे पोहचले याच्या आठवणी भाजपच्या ( BJP ) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज जागवल्या. शहरातील अंकुशनगर भागात लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात आले, याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या प्रचारसभेत मी आईच्या कडेवर असायचे. यावेळी सभेसाठी जमलेल्या लोकांना आई सांगायची, मुंडे साहेब यांचं चिन्ह कमळ आहे आणि ही आमची मुलगी पंकजा. त्यावेळी लोकांना मुंडे साहेब माहिती होते पण कमळ हे पक्ष चिन्ह माहिती नव्हते, मात्र मुंडे साहेबांनी मोठ्या कष्टाने ते खेडोपाडी नेले. तेंव्हापासून मी भाजपचा प्रचार करायचे, अशी आठवण यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितली.
राज्यात भारतीय जनता पक्ष मोठा करण्यात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा आहे. सुरुवातीच्या काळात नवीन असलेला पक्ष खेडोपाडी नेण्यासाठी मुंडे साहेबांनी मोठे कष्ट घेतले. लहानपणापासून त्यांच्या संघर्ष जवळून पाहिला असल्याचे पंकजा मुंडे यांनी शहरातील एका कार्यक्रमात सांगितले. तसेच यावेळी मुंडे कुटुंबाचे आणि त्यांचे पक्षासोबतचे नाते किती जुने आहे, याबद्दल भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, मी नऊ महिन्यांची होते, तेव्हापासून मुंडेसाहेबांच्या प्रचारात आई मला घेऊन जायची. माझी आई मला कडेवर घेऊन जायची, अशा आठवणी पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमात बोलताना जागवल्या.
मामा प्रमोद महाजन यांनी सुचवले नावपंकजा यांच्या नावाच्या बाबतीत एक किस्सा प्रसिद्ध आहे. पंकजा यांचे नाव त्यांचे मामा म्हणजेच प्रमोद महाजन यांनी ठरवले होते. मुलगा झाला तर पंकज आणि कन्या झाली तर पंकजा. कारण त्याच दरम्यान भारतीय जनता पक्षाला कमळ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. कमळाचा समानार्थी शब्द पंकज असा होतो. गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञा मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे यांचा जन्म २६ जुलै १९७९ रोजी परळीत झाला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांचे नाव पंकजा असे ठेवण्यात आले.